पुणे : बहुजननामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. पुणे शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली आहे. प्रशासनाने कडक निर्बंध लागू कल्यानंतर देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 5 हजार 600 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 47 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना मृतांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 99 हजार 721 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 38 रुग्ण शहरातील आहेत तर 9 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 5 हजार 526 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 3 हजार 481 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 49 हजार 373 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 17 हजार 389 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 44 हजार 822 इतकी आहे. त्यापैकी 475 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 82 हजार 904 इतकी झाली आहे. यापैकी 4 लाख 94 हजार 984 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे जिल्ह्यामध्ये 77 हजार 730 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात 10 हजार 190 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 1.75 टक्के आहे. पुणे जिल्ह्यामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 84.92 टक्के आहे.