B: बहुजननामा ऑनलाइन – देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. पुण्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून चाचण्यांचे प्रमाण देखील वाढवण्यात आले आहे. पुणे शहरात दिवसभरात 4 हजार 077 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 46 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना मृतांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 94 हजार 121 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 36 रुग्ण शहरातील आहेत तर 10 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 5 हजार 488 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 3 हजार 240 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 45 हजार 892 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 18 हजार 720 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 35 हजार 849 इतकी आहे. त्यापैकी 919 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 5 लाख 74 हजार 829 रुग्णांपैकी 4 लाख 86 हजार 677 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 78 हजार 017 आहे. कोरोनाबाधित एकूण 10 हजार 135 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.76 टक्के इतके आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 84.66 टक्के आहे.