पुणे : बहुजनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी चिंचवडमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पुण्यामध्ये गेल्या 24 तासत 5 हजार 647 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 51 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.
पुणे शहरामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना मृतांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 18 हजार 029 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 44 रुग्ण शहरातील आहेत तर 7 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 5 हजार 654 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 4 हजार 587 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 62 हजार 420 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (शुक्रवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 27 हजार 986 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 49 हजार 955 इतकी आहे. त्यापैकी 1003 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये लसीकरण मोहीम जोरात राबवण्यात येत आहे. मात्र आज लसीचा डोस शिल्लक नसल्याने लसीकरण केंद्र बंद करण्यात आले होते. आज केंद्र सरकारकडून पुणे जिल्ह्याला कोरोना लसीचा थेट पुरवठा सुरु झाला आहे. आज जिल्ह्यासाठी 2 लाख 48 हजार लस प्राप्त झाल्या आहेत.तर रविवारी 1 लाख 25 हजार लस मिळणार आहेत. यामध्ये शहराला 40 टक्के, ग्रमीणला 40 टक्के आणि पिंपरी-चिंचवडला 20 टक्के लस मिळणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करुन दिली आहे.