पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने चिंता अधिक वाढली आहे. शिवाय राज्यात सर्वाधीक अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी पुण्यात येत असल्याने पुण्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात 2 हजार 902 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 हजार 986 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 39 हजार 251 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 86 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 66 रुग्ण शहरातील आहेत तर 20 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 7 हजार 184 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 2 हजार 986 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3 लाख 92 हजार 485 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (गुरुवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 18 हजार 862 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 39 हजार 485 इतकी आहे. यापैकी 1414 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 8 लाख 85 हजार 592 रुग्णांपैकी 7 लाख 75 हजार 250 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 96 हजार 608 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 हजार 734 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 87.54 टक्के आहे.