पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाचा ज्वर वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध जाहीर केले आहेत. त्यानंतर रात्री अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानेही बंद राहतील, असे जाहीर केले आहे. मात्र, उपनगर आणि परिसरातील काही ठिकाणी दुकाने बंद होती, तर हडपसरमधील सर्रास सर्व दुकाने खुली असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेकांना मोठा संभ्रम पडला होता. दुपारी १२ नंतर हडपसर पोलिसांची व्हॅन आणि दुचाकीवरून गस्त सुरू झाल्यानंतर अनेकांनी दुकाने बंद केल्याचे दिसून आले.
कोरोनाच्या भीतीने सर्रास नागरिक मास्क वापरत असल्याचे दिसून आले. तसेच कामाशिवाय घराबाहेर पडायला नको अशीच मानसिकता बहुतेकांची झाली आहे. कामगारवर्ग वगळता अनेकांनी घरातच थांबणे पसंत केले आहे. पीएमपी बससेवा बंद असल्याने रस्त्यावर वाहतूककोंडीसारखा प्रकार दिसत नव्हता. बस बंद असल्याने बऱ्यापैकी धंदा होत असल्याची रिक्षाचालकांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, लॉकडाऊनपूर्वी जो धंदा होत होता, तेवढा धंदा होत नसल्याचे रिक्षाचालकांसह जीप, सहाआसनी आणि खासगी प्रवासी वाहनचालकांनी सांगितले.
हडपसर गाव आणि मार्केटमधील सर्व दुकाने सुरू होती. उद्यापासून सर्व व्यवहार बंद राहणार असल्याने ग्राहकांनी आज कडाक्याच्या उन्हातही खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. हडपसर गाडीतळ ते मगरपट्टा चौक दरम्यान सर्व दुकाने सुरू होती. तेथे ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, लोणी काळभोर परिसरातील दुकाने पोलिसांनी सकाळीच बंद केली होती. मात्र, हडपसरमधील दुकाने सुरू असल्याचे पाहून दुकानदारांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली.
दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानंतर बहुतेकांनी दुकाने बंद केली. मेडिकल दुकाने, खाद्यपदार्थ आणि हॉटेलमधील पार्सल सेवा सुरू होती. अमृततुल्यची दुकानेही सुरू राहिली. दुकानदार म्हणाले की, बंद करायचे होते, तर कालच रात्रीच सांगणे अपेक्षित होते. फुलविक्रेत्या दुकानदारांनी हार बनवून ठेवले होते. सायंकाळपर्यंत विक्री होते, घरगुती पूजा करण्यासाठी फुले आणि हार अनेक नागरिक नेतात, त्यासाठी आम्ही दररोज तयारी करतो, त्या पद्धतीने आजही केली होती. मात्र, दुपारी १२ नंतर पोलिसांनी अचानक दुकाने बंद करायला लावल्यामुळे हार-फुलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, त्याला जबाबदार कोण असा सवालही अनेक दुकानदारांनी उपस्थित केला.