बहुजननामा ऑनलाइन – एका नामांकित कंपनीत नोकरी देण्याच्या आमिषाने उच्च शिक्षीत तरुणीची ३३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरुणीने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीला चांगल्या आयटी कंपनीत नोकरी हवी होती. त्यासाठी ती नोकरीच्या शोधत होती. आरोपींनी तरुणीशी संपर्क साधला. एका नामांकित कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्या कंपनीत एचआर विभागात नोकरीला असल्याचे सांगितले. नोकरी लावण्यासाठी तरुणीला काही पैसे भरावे लागतील, असे सांगत तिचा विश्वास संपादन केला. चांगल्या पगाराच्या नोकरीच्या आमिषाने तरुणीने देखील आरोपींनी सांगितलेल्या खात्यावर ३३ हजार ३४० पाठविले. पण, तरुणीला नोकरी लावली नाही. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी तिला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली. अधिक तपास कोथरूड पोलिस करत आहेत.
तसेच दुसऱ्या घटनेत 55 वर्षीय महिलेला सायबर चोरट्याने क्रेडीट कार्डचा गोपणीय क्रमांक देण्याच्या बहाण्याने फसविले आहे. त्यांच्याकडून ६१ हजार रुपये उकळले आहेत. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेचे एसबीआय बँकेचे क्रेडीट कार्ड आहे. पण, त्यांनी कार्डचा काहीही वापर केला नाही. त्यांना एका व्यक्तीने फोन केला. त्यांचे क्रेडीट कार्डचा गोपणीय क्रमांक देतो म्हणून सर्व माहिती घेतली. त्या माहितीच्या आधारे ६१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. अधिक तपास फरासखाना पोलिस करत आहेत.