पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे पोलिसांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा आणखी एक काळ्या बाजार समोर आणला असून, दोघा भावांना याप्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन इंजेक्शन व दुचाकी जप्त केल्या आहेत. बालेवाडीत ही कारवाई केली आहे.
प्रदीप देवदत्त लाटे (वय २५), संदीप देवदत्त लाटे (वय २३, दोघे सध्या रा. मोझे महाविद्याालयाजवळ, बालेवाडी, मूळ रा. बेलुरा, जि. बीड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात कोरोना भयंकर काळात रेमिडेसिव्हीर इंजेक्शनचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसत आहे. त्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हा काळा बाजार रोखण्यासाठी 10 पथके तयार केले आहेत. यादरम्यान बालेवाडी परिसरात एकजण रेमडेसिव्हीर इंजेक्शन पंचवीस हजार रुपयांना विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने बालेवाडी भागात सापळा लावून दोघांना पकडले.
ही कारवाई उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रजनीश निर्मल व त्यांच्या पथकाने केली आहे. आता पर्यंत पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत 9 जणांना अटक करत त्यांच्याकडून 9 इंजेक्शन जप्त करण्यात आली आहे.