पुणे: बहुजननामा ऑनलाईन- कोरोना संकटात राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तीं(Disabled person)ना राज्य सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे, या मागणीसाठी प्रहार संघटना व दिव्यांग संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुण्यात दिव्यांग आयुक्तालयाजवळ गुरुवारी (दि. 27) भीक मागो आंदोलन करण्यात आले.
कोरोनाच्या महामारीत अनेक लोकांबरोबर दिव्यांगां(Disabled person) चाही रोजगार गेला आहे. तसेच छोटे मोठे व्यवसाय बंद पडल्याने त्यांना अनेक आर्थिक अडचणी येऊ लागल्या आहेत. सरकार गरीब, गरजूना आर्थिक मदत करत आहे. त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी योग्य ते पाऊल उचलले आहे. अशा परिस्थितीत दिव्यांगाना देखील आर्थिक मदत करावी, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष धमेंद्र सातव, दत्ता मिरगणे, सुप्रिया लोखंडे, युवराज नवले आदी उपस्थित होते.