पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोंढव्यात पूर्ववैमनस्यातून एकाला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळक्याने ‘सुबह तक तेरी विकेट लेंगे’ अशी धमकी देत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. तर परिसरात तुफान राडा घालत दहशत माजवली आहे. याप्रकरणी जुलकर हरून खान (वय 42) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शाहबाज उर्फ खवल्या, शाहरुख दलाल, सलमान उर्फ लड्डू दूधवाला, मुन्ना व त्याच्या दोन साथीदारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मीठानगर परिसरात मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते. यावेळी आरोपी त्याठिकाणी हातात लाकडी दांडके घेऊन आले. शाहबाज उर्फ खवल्या याने फिर्यादी यांच्याकडे पाहून “तू मेरे को पहचानता है क्या? मै इधर का भाई हू, मेरे को डरने का, नही तो बस्ती जलाउंगा” असे म्हणत हातातील लाकडी दांडक्याने मारहाण केली, तर इतर आरोपींनी ही त्यांना लथाबुक्यांनी मारहाण केली आहे. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी दुपारी घडला आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.