पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील तबल 22 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांना खडकी मुख्यालयात हजर होण्यास सांगण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले असून, लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. रेल्वे स्थानकात परप्रांतीय प्रवाशांकडील पैसे जबरदस्ती काढून घेण्याच्या प्रकारामुळे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या बदलीनंतर पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात नवीन 50 कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे बदनामीनेच गाजते. प्रवाशांची चेकिंग करत त्यांना या ठाण्यात आणून अडवणूक करत असल्याचे प्रकार यापूर्वीही आढळून आले आहे दरम्यान पुणे स्थानकात प्रवाशांची गर्दी नियंत्रित करणे, समाजकंटक, गुन्हेगार, बोगस तिकीट विक्रेते, हॉकर्स यांच्याकडून गैरकृत्य होणार नाहीत, याची खबरदारी घेणे ही जबाबदारी संबंधित 22 लोहमार्ग पोलिस अंमलदारांवर होती. मात्र, काहीजण नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाल्या. त्यावरून या अंमलदारांकडून त्यांची जबाबदारी पार पाडली जात नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलिस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी कर्मचाऱ्यांची खडकी येथील पुणे लोहमार्ग पोलिस मुख्यालयात बदली केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई…
पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात एक उपविभागीय अधिकारी, दोन निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक, असे बारा अधिकारी आहेत. तर, त्यांच्या मदतीला इतर अधिकारी व कर्मचारी आहेत. प्रवाशांना त्रास दिल्याचा कोणताही प्रकार भविष्यात आढळून आल्यास, या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कसुरी अहवाल राज्य सरकारला पाठविला जाईल, त्यांच्या बदलीचा प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे तंबीच सदानंद वायसे पाटील यांनी दिली आहे.
नेमका प्रकार काय ?
कारवाईची भिती दाखवित लोहमार्ग पोलिस कर्मचारी परप्रांतीय प्रवाशांना लुटत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी केला आहे. तर त्यांनी पुणे लोहमार्ग पोलिस, रेल्वे सुरक्षा दल, स्टेशन डायरेक्टर व लोहमार्ग पोलिस अधीक्षक यांची भेट घेतली होती. दरम्यान, मोरे यांनी स्वत: वेशांतर करून रेल्वे स्थानकात दोन दिवस पाहणी केली होती. मात्र, त्यांना प्रत्यक्ष असा प्रकार आढळून आला नव्हता.
प्रवाशांच्या लुटीशी लोहमार्ग पोलिसांचा संबंध नाही. मात्र, रेल्वे स्थानकात विविध गुन्ह्यात यापूर्वी २३ तोतया पोलिसांवर लोहमार्ग पोलिसांनी कारवाई केली आहे. हेच लोक किंवा अशा प्रवृत्ती वारंवार गुन्हे करत असण्याची शक्यता आहे. या प्रकारांना अटकाव करू न शकल्याने २२ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
– सदानंद वायसे पाटील (अधीक्षक, पुणे लोहमार्ग पोलिस)
बदली झालेले कर्मचारी; कंसात बक्कल नंबर
सहाय्यक उपनिरीक्षक जाधव, पोलीस हवालदार (बक्कल नं. 340) काळे, (बक्कल नं. 927) साळवी, (बक्कल नं. 338) दगडे, (बक्कल नं. 330) राठोड, (बक्कल नं. 1155) कुलकर्णी, पोलीस नाईक (बक्कल नं. 219) केगार, (बक्कल नं.16) पोकळे, (बक्कल नं. 713) तांबोळी, (बक्कल नं. 803) टेकावडे, (बक्कल नं.1223) मंजुळे, (बक्कल नं. 870)कपिले, (बक्कल नं. 679) शेख, (बक्कल नं. 468) राऊत, पोलीस शिपाई (बक्कल नं. 312) गोसावी, (बक्कल नं. 433) अंधारे, (बक्कल नं. 777) सोनवणे, (बक्कल नं. 45) ईपर, (बक्कल नं. 315) पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे (बक्कल नं. 483) बोराटे, (बक्कल नं. 910) सोनवणे आणि (बक्कल नं. 64) कुंजीर