Pune Airport News | पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलवरुन 8 फेब्रुवारीपासून ‘डिजीयात्रा’ सेवा !

January 31, 2025

पुणे : Pune Airport News | पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर येत्या ८ फेब्रुवारीपासून ‘डिजीयात्रा’ ही प्रणाली कार्यान्वित होणार असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या यांच्या उपस्थितीत या सेवेचा प्रारंभ केला जाणार आहे.

डिजीयात्रा ही सेवा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जुन्या टर्मिनलवर कार्यान्वित होती. मात्र नवीन टर्मिनलवर ‘डिजीयात्रा’ची सेवा प्रतिक्षेत होती. या संदर्भातील सर्व परवानग्या आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या असून ही प्रणाली सेवेसाठी सज्ज होत आहे. देशांतर्गत प्रवाशांसाठी विमानतळ प्रवास सोपा आणि सोयीस्कर करण्यासाठी डिजीयात्रा सुविधा सुरू करण्यात आली आहे. डिजी यात्रा पूर्णपणे बायोमेट्रिक सेल्फ-बोर्डिंग सिस्टम देते, ज्यामुळे प्रवाशांना प्रवेशद्वारापासून विमानात चढेपर्यंत अखंड हालचाल सुनिश्चित होते.

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मुरलीधर म्हणाले, ‘पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कायापालट होत असून हे विमानतळ अधिकाधिक अद्ययावत सोईसुविधांयुक्त करण्यासाठी विविध पातळ्यांवर काम सुरु आहे. डिजीयात्रा प्रणाली कार्यान्वित करणे हा त्यापैकीच एक भाग आहे. या सुविधेमुळे बोर्डिंग पास मिळविण्यासाठीच्या रांगा टाळता येणार असून सहज आणि कमी वेळेत बोर्डिंग पास उपलब्ध होणार आहेत.

‘देशभरात १ डिसेंबर २०२२ पासून डिजीयात्रा सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रणाली अंतर्गत ८० लाखांहून अधिक उपभोक्ते जोडले गेले आहेत. तसेच ४ कोटींहून अधिक वेळचा प्रवास या सेवेतून झालेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या डिजीयात्राचे वापरकर्ते वाढत आहेत. पुणे विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या डिजीयात्री वापरकर्त्यांची संख्या अधिक असल्याने याचा मोठा फायदा पुणेकरांना विमान प्रवाशांना होणार आहे, असेही केंद्रीय मोहोळ म्हणाले