पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड आयुक्तालयात एसीबी पथकाने धडक कारवाई करत एका कर्मचाऱ्याला 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकले आहे. कारवाईत वरिष्ठ असल्याच्या चर्चेने जिल्ह्यात तुफान खळबळ उडाली आहे. मात्र त्याबाबत अद्याप काहीच माहिती बाहेर आलेली नाही.
याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. यातील तक्रारदार यांना पोलीस सुरक्षा पाहिजे. त्यासाठी त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर या कर्मचाऱ्याने 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याबाबत त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती.
यानुसार आज साडे आठ वाजण्याच्या सुमारास सापळा कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सुरू आहे. दरम्यान एसीबीने पकडलेला कर्मचारी सहाय्यक उपनिरीक्षक असल्याचे समजते. त्याला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एका अधिकाऱ्याचे नाव असल्याचे बोलले जात आहे. पण त्याबाबत अद्याप काही सांगता येणार नाही. त्याची माहिती घेतली जात असून, पूर्ण खात्री करण्यासाठी वेळ लागणार असल्याचे एसीबीच्या सूत्रांनी सांगितले.