Pune ACB Trap Case | लाचखोर पीएसआयच्या घरी सापडले ‘घबाड’ ! 51 लाखांची रोकड, दागदागिने, मालमत्तेची कागदपत्रे जप्त, पोलीस निरीक्षकाची होणार चौकशी
पुणे : Pune ACB Trap Case | ४ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात २ कोटी रुपयांची लाच मागून त्याचा पहिला हप्ता स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रवींद्र चिंतामणी (PSI Pramod Ravindra Chintamani) याला रविवारी सापळा रचून पकडले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने चिंतामणी याचा भोसरीतील दिघी रोड येथील गंगोत्री पार्कमधील सोपान रेसिडेन्सी येथील घरावर दुसर्या पथकाने छापा घातला. या घर झडतीत पोलिसांना मोठे घबाड आढळून आले आहे.
पोलिसांनी या घरझडतीत तब्बल ५१ लाख रुपयांची रोकड आढळून आली. याशिवाय दागदागिने, मालमत्तेची कागदपत्रे आढळून आली.रात्री उशिरापर्यंत ही मोजदाद सुरु होती. एखाद्या पोलीस उपनिरीक्षकाच्या घरात इतकी मोठी रोकड आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
प्रमोद चिंतामणी याने लाचेची मागणी करताना १ कोटी त्याच्यासाठी व १ कोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसाठी मागणी केली होती. त्यामुळे त्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचीही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी केली जाणार आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस दल तसेच अनेक मोठ्या शहरातील आर्थिक गुन्हे शाखेत गुंतवणुकीच्या बाबतीत कोट्यावधीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास सुरु असतो. कागदपत्रे किचकट असल्याच्या नावाखाली अनेकदा केवळ गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जाते. तसेच गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींवर कारवाई करताना फिर्यादीला जेरीस आणले जाते. आरोपींना वेगवेगळ्या प्रकारे सुट देण्याच्या नावाखाली मोठा मलिदा मिळविला जात असल्याचे बोलले जाते. प्रमोद चिंतामणी याच्यावरील कारवाई या चर्चेला पुष्टी मिळाली आहे.
प्रमोद चिंतामणी याला सोमवारी न्यायालयात हजर करुन अधिक तपासासाठी पोलीस कोठडी घेण्यात येणार आहे.


