Pune ACB News | अँन्टी करप्शन आता लोकांच्या दारात ! प्रत्येक तालुक्यात लोकांच्या भ्रष्टाचाराविषयक तक्रारी ऐकणार

October 5, 2024

पुणे : Pune ACB News | शासकीय नोकरांच्या भ्रष्टाचाराविषयी तक्रार करायची असेल तर त्यांना पुण्याला यावे लागते़ हे टाळण्यासाठी व लोकांशी थेट संपर्क व्हावा, यासाठी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लोकांपर्यत जाणार आहे. या महिन्याभरात अ‍ॅन्टी करप्शनचे अधिकारी पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक दिवस जाणार आहेत. तेथील शासकीय विश्रामगृहात सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहेत. (Anti Corruption Bureau Pune)

याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (SP Shirish Sardeshpande) यांनी सांगितले की, भ्रष्टाचारी लोकसेवकांवर अंकुश राहून लोकांची कामे व्हावीत, यासाठी आता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पुढाकार घेतला असून लोकांमध्ये जाण्याचे निश्चित केले आहे. अनेकदा लोकांना शंका असते की आपण तक्रार दिली तर, आपले काम होणार नाही. आपली अडवणूक केली जाईल. आमचे अधिकारी लोकांच्या शंकांचे निरसन करतील. या लोकसंवादाची प्रसिद्धी प्रत्येक तालुक्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी हँडबिले, स्टिकर तयार करण्यात आली आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे काम कसे चालते, याची माहिती आमचे अधिकारी लोकांना देतील. तेथे आलेल्या लोकांना माहितीपट दाखविण्यात येईल. लोकांच्या तक्रारीची दखल घेतली जाईल.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असलेले तालुक्याचे ठिकाण आणि दिवस पुढील प्रमाणे

१) भोर – मंगळवार ८ ऑक्टोबर २०२४
२) लोणावळा – बुधवार ९ ऑक्टोबर २०२४
३) बारामती – गुरुवार १० ऑक्टोबर २०२४
४) खेड राजगुरुनगर – शुक्रवार ११ ऑक्टोबर २०२४
५) नारायणगांव – शनिवार, १२ ऑक्टोबर २०२४
६) दौंड – रविवार, १३ ऑक्टोबर २०२४
७) सासवड – सोमवार १४ ऑक्टोबर २०२४
८) शिरुर -शनिवार, १९ ऑक्टोबर २०२४
९) इंदापूर -रविवार, २० ऑक्टोबर २०२४
१०) जुन्नर – रविवार २७ ऑक्टोबर २०२४

नागरिकांनी या वेळी अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या अधिकाºयांची भेट घेऊन त्यांच्याकडील माहिती/ तक्रारी सादर करु शकतात, असे आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.