पुणे : बहुजननामा ऑनलाईन – चोरीचा मोबाईल असल्याची माहिती देण्यास घरी आल्याने दोघांनी एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वारकरत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर मध्यरात्री परिसरात दहशत पसरवत तुफान गोंधळ घातला. पोलिसांनी सूत्र हलवत दोघांना अटक केली.
सौरभ राजू भगत (वय २१, रा. मोरे वस्ती, सहकारनगर) व अजय जवाहर प्रजापती (वय २०, सुखसागरनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सूरज कामथे (वय २९, रा. धनकवडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज रिक्षाचालक असून आरोपी सौरभ व अजय एकमेकांच्या ओळखीचे आहेत. काही दिवसांपुर्वी सूरजने सौरभला त्याचे सीमकार्ड दिले होते. सौरभने एक दिवस सीमकार्ड वापरून पुन्हा सूरजला दिले. त्यानंतर राजगड पोलिसांनी सूरजला फोन करुन सीम कार्ड टाकलेला मोबाईल चोरीचा असल्याची माहिती दिली. तो मोबाइल पोलिस ठाण्यात जमा करण्याचे सांगितले. त्यामुळे ही माहिती सांगण्यासाठी सूरज सौरभच्या घरी गेला. त्याचा राग आल्यानेे सौरभ आणि अजयने सूरजवर चाकुुहल्ला केला. त्याच्यावर वार करुन गंभीर जखमी केले. त्याशिवाय हातात चाकुु घेउन परिसरात दहशत माजविली. त्यामुळे दुकानदारांनी दुकाने बंद करुन पळ काढला. हा प्रकार समजताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच शोध घेऊन लागलीच त्यांना अटक केली. अधिक तपास सहायक निरीक्षक किरण पावसे हे करत आहेत.