पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – हिंजवडी आयटी पार्क शेजारील माणमधील वाढत्या कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेता माण ग्रामपंचायतीने 9 ते 16 जुलै दरम्यान संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, लॉकडाउनमध्ये विनाकारण फिरताना आढळल्यास 500 रुपये दंड आकारला जाणार आहे.
लॉकडाउन कालावधीत मेडिकल स्टोअर वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असून सकाळी 7 ते 8 या वेळेत एक तास दूध विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. हिंजवडी व आसपासच्या गावांमध्ये बरीच ठिकाणे व इमारती सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. गेल्या तीन दिवसापासून राजीव गांधी आयटी पार्क व आसपासच्या भागात हिंजावडीतील आठ, नेरेमधील सहा, जांबेमधील तीन, माणमधील पाच आणि मारुंजीतील पाच, असे एकूण 27 कोरोना रूग्ण सापडले आहेत.
रूग्ण सापडण्याचे प्रमाण वाढल्यामुळे मावळ – मुळशी उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी खालील ठिकाणे सूक्ष्म कंटेन्मेंट झोन घोषित केले आहेत. या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात रहिवाशांच्या हालचालींवर बंधन असणार आहेत.