पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरात २५ मार्चला फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण बंद करण्यात आले असताना औंध येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये तब्बल ११० फ्रंट लाईन वर्कर्सना लस देण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष असे की या रुग्णालयानेच महापालिकेच्या आरोग्य अधिकार्याकडून लस पुरवठा केला जात नसल्याचे तसेच लस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पैेसे मागितल्याची तक्रार महापालिकेकडे न करता एका माजी महापौराकडे केली होती. याच रुग्णालयात हे लसीकरण करण्यात आल्याने ‘लसीकरण’ व्यवस्थेमधील गूढ अधिकच गडद झाले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील दोन-तीन राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारी व कर्मचार्यांचे फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. बँकेचे अधिकारी व कर्मचार्यांना अर्थ मंत्रालयाने कोरोना काळात उत्कृष्ठ सेवा बजावल्याबद्दल कोव्हीड वॉरीयर्स म्हणून जाहीर केले असले तरी केंद्रीय आरोग्य विभागाने त्यांचा फ्रंटलाईन वर्कर्स मध्ये समावेश केलेला नाही. असे असताना महापालिकेच्या आरोग्य विभागातील दोन अधिकार्यांनी २३ मार्चला काही बँकांच्या मागणीवरून ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ म्हणून बँकेतील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील सर्वांना कोरोना लसीकरण करण्याचे पत्र दिले आहे. दरम्यान, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनने नुकतेच पुन्हा एकदा बँक कर्मचार्यांना प्राधान्याने लस द्यावी, अशी मागणी केली आहे. यामुळे ठराविकच बँकांना त्यांच्याकडील १८ वर्ष वयापुढील सर्व अधिकारी, कर्मचार्यांना लस देण्याबाबतचे पत्र महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष असे की महापालिका आयुक्त स्तरावर या परवानगीची माहिती नाही.
दरम्यान, देशात १६ जानेवारीपासून कोरोनाशी थेट लढा देणारे आरोग्य कर्मचारी, शासकिय व निम शासकिय सेवेतील अधिकारी व कर्मचार्यांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. १ मार्चपासून ६० वर्षांवरील तसेच ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्तांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली असून १ एप्रिल पासून ४५ वर्षावरील सर्वांचे लसीकरण सुरू झाले आहे. दुसर्या टप्प्यातील लसीकरण सुरू झाल्यानंतर २३- २४ मार्चला फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण थांबविण्यात आले. यानंतर ५ एप्रिलपासून पुन्हा फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र, या कालावधीत २५ मार्चला शहरातील काही लसीकरण केंद्रांवर एखाद दुसरे वगळता फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण करण्यात आले. तर औंध येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये या एकाच दिवशी तब्बल ११० फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे फ्रंटलाईन वर्कर्स नेमके कोण होेते? याचा तपशील मिळू शकलेला नाही. मात्र, या केंद्रावर एका मल्टीनॅशनल बँकेतील अधिकारी, कर्मचार्यांचे फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून लसीकरण झाल्याची जोरदार चर्चा आहे.
यासंदर्भात महापालिकेच्या सह आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांच्याकडे विचारणा केली असता, त्या म्हणाल्या की लसीकरणासाठीच्या कोविन ऍपमध्ये लसीकरणासाठी आलेल्यांची माहिती भरण्यात येते. सर्व लसीकरण केंद्रांकडून महापालिकेकडे दररोज फ्रंट लाईन वर्कर्स, ४५ वर्ष, ६० वर्षांवरील व्यक्ती तसेच ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त किती व्यक्तींना लस दिली याची केवळ आकडेवारील प्राप्त होते. औंध येथील संबधित रुग्णालयामध्ये २५ मार्चला कोणत्या फ्रंटलाईन वर्कर्संना लस देण्यात आली, याचा तपशील मागविण्यात येईल.