Puja Khedkar | IAS पद गेलेली पूजा खेडकरची याचिका हायकोर्टाने निकाली काढली; कोर्टात नेमकं काय घडलं?
दिल्ली: Puja Khedkar | प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे अनेक घोटाळे समोर आल्यानंतर UPSC ने तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. तसेच तिला आपली बाजू मांडण्यासाठी ३१ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंतची मुदत दिली होती.
पण पूजाने मुदत उलटून गेली तरी काहीच उत्तर दिले नव्हते. तसेच पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांविरोधात (Pune Collector) केलेल्या तक्रारीबाबत पुणे पोलिसांनी देखील पूजाला तीनदा समन्स पाठवून जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. पण याची देखील तिने दखल घेतली नव्हती.
दरम्यान, पूजाने दिल्लीच्या कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. त्यामुळे आता पूजाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तिला शोधून अटकेची कारवाई करावी लागणार आहे.
वडिलांची कोट्यवधींची मालमत्ता असूनही क्रिमीलेअर सुविधेचा लाभ घेऊन ओबीसी कोट्यातून अर्ज केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय, बेकायदेशीरपणे दिव्यांग असल्याची चुकीची कागदपत्रे सादर केल्याचाही आरोप पूजा खेडकर वर ठेवण्यात आला.
आपलं आयएएस पद गेलेली पूजा खेडकरची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. मेरीटवर कमेंट न करता योग्य त्या प्राधिकरणाकडे दाद मागण्याचे याचिका कर्त्यांना उच्च न्यायालयाने स्वातंत्र्य दिले आहे. पूजा खेडकरच्या वकिलांनी यूपीएससीने तिचे आयएएस पद रद्द केल्याचे कळवलं नाही, त्यांनी थेट प्रेस नोट काढून सांगितले असे पूजा खेडकरच्या वकिलांनी कोर्टात सांगितले आहे.
यूपीएससीने पूजा खेडकरचे आयएएस पद रद्द केल्याचे पत्र पाठवणे गरजेचे होते,असा युक्तिवाद पूजा खेडकरच्या वकिलांनी कोर्टासमोर केला आहे. त्यावरती यूपीएससीने सांगितले की ती कुठे आहे हे माहीत नसल्यामुळे आम्ही याबाबतचे पत्रक काढलं. आम्ही पुढच्या दोन दिवसात तिला ई-मेल आणि तिच्या शेवटच्या पत्यावर ही माहिती पाठवू असंही यावेळी यूपीएससी कडून सांगण्यात आले आहे. यूपीएससीने दिलेल्या माहितीनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली आहे.
Comments are closed.