नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर विवरणपत्र भरण्यासाठी आणि मोठ्या आर्थिक व्यवहारासाठी पॅन नंबर आवश्यक आहे. त्यामुळे कुठलाही फॉर्म भरताना पॅन क्रमांक काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. कारण नियमांनुसार, जर तुम्ही एखाद्या फॉर्ममध्ये चुकीचा पॅन नंबर दिला असेल, तर तुम्हाला १०,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. आयकर कायदा १९६१ च्या कलम २७२ बी अंतर्गत आयकर विभाग चुकीचा पॅन नंबर भरल्यानंतर दहा हजार रुपये दंड आकारू शकतो.
आयकर विवरणपत्र भरताना किंवा मोठा आर्थिक व्यवहार करण्यासोबतच बँक खाती उघडताना, वाहने खरेदी करणे, म्युच्युअल फंड खरेदी करणे, समभाग, बॉन्ड्स, डिबेंचर अश्या जवळपास २० घटनांची यादी आयकर विभागाकडे आहे. जिथे पॅन क्रमांक देणे बंधनकारक आहे. महत्वाचे म्हणजे तुम्हाला एकदा पॅनकार्ड दिल्यानंतर पुन्हा अर्ज करता येणार नाही, पॅन कार्ड फक्त एकदाच बनवले जाते.अनेक ठिकाणी फॉर्ममध्ये पॅन क्रमांक भरल्यानंतरही पॅनकार्डची प्रत शोधली जाते. कारण, जर आपण अनवधानाने चुकीचा पॅन नंबर भरला असेल तर तो फोटोकॉपीद्वारे सत्यापित केला जाऊ शकतो.
दरम्यान, आपण पॅन कार्ड विसरला असेल तर त्याऐवजी आपण आधार क्रमांक देखील देऊ शकता. यासंदर्भात नुकतेच सरकारने घोषणा केली आहे. याशिवाय मोठ्या व्यवहारात पॅन किंवा आधार क्रमांकाचा उल्लेख नसल्यास दंडही होऊ शकतो. दरम्यान कर विभागाच्या नियमांनुसार कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा जास्त पॅन घेण्याची परवानगी नाही. आयकर कायदा १९६१ च्या कलम २७२ बी नुसार एखाद्याकडे एकापेक्षा जास्त पॅन असल्यास १०,००० रुपये दंड आकारला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत आपल्याकडे २ पॅनकार्ड असल्यास पर्यायी पॅनकार्ड कर विभागात जमा करावे. जर पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नसेल तर ३१ डिसेंबर २०१९नंतर ते अवैध घोषित केले जाऊ शकते.
Visit : bahujannama.com