नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भविष्य निर्वाह निधी (पीएफ) कोणत्याही नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी सर्वात महत्वाचा असतो. हा निधी सुरक्षित भविष्यासाठी गरजेचा असतो. म्हणूनच बहुतेक नोकरी करणारे लोक निवृत्तीच्या दिवशी पीएफचे पैसे काढतात.
आपणसुद्धा असा विचार करत असाल तर सर्व प्रथम आपल्या युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (युएएन) क्रमांकाला आधारशी लिंक करणे गरजेचे आहे. जर तुम्ही आधार युएएन क्रमांकाशी जोडलेले नसेल तर तुम्हाला पीएफशी संबंधित आवश्यक सुविधा मिळणार नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त सुनील बर्थवाल म्हणाले की, पीएफच्या जास्तीत जास्त फायद्यासाठी युएएनला आधारशी जोडण्याची गरज आहे. सुनील बर्थवाल म्हणाले की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) अशा प्रणालीवर काम करीत आहे. ज्यामध्ये सेवानिवृत्तीच्या दिवशी त्या व्यक्तीला भविष्य निर्वाह निधी मिळेल आणि वेळेवर पेन्शन मिळेल.
2017 मध्ये तत्कालीन केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी संसदेला या सुविधेची माहिती दिली. तसेच, ईपीएफओ नियोक्त्यांच्या स्वयंचलित योगदानाचे अनुपालन करण्यासाठी लवकरच ई-तपासणी प्रणालीची सुरुवात होईल.