अकोला : बहुजननामा ऑनलाईन – अकोल्याच्या ग्रामीण भागातील मनूताई कन्या शाळेत इयत्ता आठवी, नववीत शिकणार्या सावित्रीच्या 14 लेकी थेट अमेरिकेला निघाल्या आहेत. कष्टकर्यांच्या या लेकींनी केलेली कामगिरी नेत्रदीपक ठरली आहे. या चौदा जणींनी शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली समाजोपयोगी स्वयंचलित रोबोट तयार केला. हा रोबोट मुंबई येथील राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत सादर करण्यात आला. त्यांच्या रोबोटने चार फेर्यांमध्ये देशभरातील 200 टीमला मागे टाकत तब्बल तीन पुरस्कार मिळवले. आता त्या 14 जणी अमेरिकेला जाण्यासाठी सज्ज झाल्यात.
शहरातील समस्या व त्यांचे निराकरण या विषयावर मुंबई लिगो एज्युकेशन ऑर्गनायझेशनच्या फर्स्ट लिगो लीगमध्ये एक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अकोल्याच्या 14 विद्यार्थिनीही सहभागी झाल्या होत्या. छोट्या-छोट्या पार्टसचा वापर करून त्यांनी आपल्या बुद्धीमत्तेचा वापर करून एक रोबोट बनवला. या रोबोटचे डिझाइन, प्रोग्रॅमिंग सुद्धा त्यांनीच केले होते. तसेच रोप स्विंग अॅक्सिडेंट प्रिव्हेन्शन हा संशोधन प्रकल्पही या चौदा जणीनी लीगमध्ये सादर केला होता.
वाजतगाजत काढली मिरवणूक
या चौदाजणींनी मुंबईच्या स्पर्धेत मिळवलेल्या यशाचे वृत्त समजताच संपर्ण शाळेने जल्लोष साजरा केला. शिक्षकांनी या विद्यार्थिनींची वाजतगाजत जंगी मिरवणूक काढली. मनूताई कन्या शाळेत इयत्ता आठवी, नववीमधील या सर्व विद्यार्थिनी मराठी माध्यमाच्या आहेत. त्यांचे आई-वडील शेतमजुरी करतात. घरची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने त्या ऑटोरिक्षाने शाळेत सुद्धा येऊ शकत नाहीत. त्या पायीच शाळेत येतात.
चॅम्पियन अॅवॉर्डसुद्धा पटकावले
बेस्ट टीमवर्क व देशातून निवडलेल्या 40 टीममधून ऑल ओव्हर चॅम्पियन अॅवॉर्डसुद्धा त्यांनी पटकावले आहे. या मुलींना मार्गदर्शन करणार्या काजल राजवैद्य यांना बेस्ट मेन्टॉरचा पुरस्कार मिळाला आहे. सानिका काळे (अकोली खु.), गौरी झामरे (खडकी टाकळी), आंचल दाभाडे (सोमठाणा), पूजा फुरसुले (अकोली बु.), सायली वाकोडे (रिधोरा), अंकिता वजिरे (भोड), समीक्षा गायकवाड (उमरी), प्रांजली सदांशिव (खडकी टाकळी), गायत्री तावरे (भौरद), प्रणाली इंगळे (सोमठाणा), रुचिका मुंडाले (रिधोरा), निकिता वसतकार (रिधोरा), स्नेहल गवई (अकोला), अर्पिता लंगोटे (रिधोरा) अशी या चौदा मुलींची नावे आहेत.
Visit : bahujannama.com