नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे माजी सॉलिसिटर जनरल आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीसाठी कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे क्वीन काऊंसिल (क्युसी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 16 मार्च रोजी हरीश साळवे यांची अधिकृतपणे नियुक्ती जाहीर करण्यात येणार आहे. मराठमोळे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची थेट ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती झाल्याने भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याचे मानले जात आहे.
ब्रिटिश सरकारच्या माहितीनुसार, महाराणीने 114 वकिलांना नियुक्त केले आहे. याशिवाय 10 वकिलांचा सन्मान करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. द हेग येथील आंतरराष्ट्रीय कोर्टात कुलभूषण जाधवप्रकरणी हरीश साळवे यांनी भारताची बाजू भक्कमपणे मांडली होती. ब्रिटनच्या महाराणीसाठी कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे क्वीन काऊंसिल (क्युसी) म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अंतरराष्ट्रीय पातळीवर अव्वल कामगिरी करून दाखवण्याची संधी त्यांना पुन्हा एकदा मिळाली आहे.
ब्रिटनच्या न्याय मंत्रालयाने नव्या नियुक्त्यांची यादी प्रसिद्ध केली असून त्यामध्ये हरीश साळवे यांचे नाव आहे. इंग्लंड आणि वेल्सच्या न्यायालयांसाठी महाराणीचे सल्लागार हे पद वकिलांचे विशेष नैपुण्य पाहून प्रदान करण्यात येते. एकूण 114 बॅरिस्टर्स आणि कायदेपंडितांची महाराणीचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 114 पैकी 30 महिला, 22 बिगर ब्रिटन वंशांचे, 26 सल्लागार, 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले, 4 सॉलिसिटर अॅडव्होकेट या पदासाठी सुमारे 258 अर्ज आले होते, त्यातील 114 जणांची नियुक्ती झाली आहे. 16 मार्च रोजी शाही समारंभात या 114 जणांची महाराणीच्या उपस्थितीत औपचारिक नियुक्ती केली जाणार आहे.