अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आऊट गोईंग सुरुच आहे. आमदार वैभव पिचड यांच्यानंतर आता त्यांचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष व शरद पवारांचे खंदे समर्थक माजी मंत्री मंत्री मधुकरराव पिचड यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.
अकोले येथील पिचड समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. मधुकरराव पिचड हे शरद पवारांचे खंदे आणि निष्ठावंत समर्थकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. ३० किंवा ३१ जुलैला पिता पुत्र जाहीररीत्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी पिचड म्हणाले की, आता वातावरण बदलत आहे. विकासाच्या बाजूने जायचे की प्रवाहाच्या विरोधात, हा प्रश्न होता. मात्र, आता आम्ही विकासाच्या बाजूने जायचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादीच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी कालच राजीनामे दिले आहेत. पिचड समर्थकांचा मेळावा आज पार पडला. या मेळाव्यात बोलताना माजी मंत्री पिचड म्हणाले, ‘आतापर्यंतच्या राजकारणात शरद पवार यांची मोठी साथ मिळाली. आता मला राजकारणात काहीही मिळवायचे नाही. यापुढे कोणतीही निवडणूक मी लढविणार नाही.आपल्यावर अनेक राजकीय वार झाले. व्यक्तिगत टीकाही झाली. मात्र, आपला कोणावरही राग नाही. भाजप प्रवेशाचे ठरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची मनमोकळी चर्चा झाली. अन्य नेत्यांसोबतही चर्चा झाली. गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील प्रत्येक वेळी आमच्यासोबत होते.’