नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची दया याचिका फेटाळल्यानंतर आता त्यांच्या फाशीची तयारी सुरू झाली आहे. यात सर्वात मोठा प्रश्न जल्लाद शोधण्याचा आहे. तिहार जेलमध्ये फाशी देण्यासाठी एकही जल्लाद नाही. या फाशी संदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातमी येत आहेत, यात १६ डिसेंबर २०१९ च्या एका दिवशी ही फाशी देण्यात येऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या प्रकरणातील दोषी आरोपी पवन गुप्ता याला मंडोली तुरुंगातून दिल्लीच्या तिहार तुरुंगात हलविण्यात आले असून तिहारमध्ये फाशीची ट्रायल देखील घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार ठाकूर या चौघांना फाशी देण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच घडलेल्या हैद्राबाद महिला डॉक्टरच्या सामूहिक बलात्कारातील चार आरोपींना एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आले. त्यामुळे आता इतक्या वर्ष प्रतीक्षेत असलेल्या निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात यावी अशी तीव्र मागणी सुरु आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी विनय शर्मा याने फाशीपासून सूट मिळावी म्हणून दया याचिका दाखल केली होती. ही दया याचिका गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींकडे पाठवली असता राष्ट्रपतींनी दयेची याचिका फेटाळून लावली. १६ डिसेंबर २०१२ मध्ये निर्भयावर सहा नराधमांनी चालत्या बसमध्ये गँगरेप केला होता. सहा पैकी एक दोषी हा अल्पवयीन होता. तो आता सुटला आहे. तर यातील एक आरोपी रामसिंहने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यामुळे यात सात वर्षांनंतर उरलेल्या चार दोषींना १६ डिसेंबर रोजीच फाशी देण्याची तयारी सुरू केली आहे.
Visit : bahujannama.com