मुंबई : वृत्तसंस्था – २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आणण्यासाठी रणनीती आखणारे प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आता पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम करणार आहेत. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीसाठी प्रख्यात आहेत. त्यांनी २०१४ साठी नरेंद्र मोदी यांच्यासाठी काम केले होते. मोदी यांच्या यशात प्रशांत किशोर यांचा मोठा वाटा होता. त्यानंतर त्यांनी संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठीही काम केले होते. पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांत त्यांनी काँग्रेससाठी काम केले होते. उत्तर प्रदेशचा अपवाद वगळता त्यांना प्रत्येक ठिकाणी यश आले आहे.अलीकडे ते जगन मोहन रेड्डी यांच्यासाठी कार्यरत होते.
आता प्रशांत किशोर ममता बॅनर्जी यांच्यासाठी रणनीती आखणार आहेत. त्यासाठी त्यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली, आणि त्यांच्यासाठी काम करण्याचे मान्य केले आहे. लोकसभेच्या तब्बल १८ जागा जिंकून भाजपने ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले आहे. दोन वर्षांत राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे प्रशांत किशोर यांची कामगिरी ममता बॅनर्जी यांच्यासाठी महत्वाची ठरणार आहे.