मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP chief Sharad Pawar) हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार होते, सध्या पवारांचा दौरा पुढे ढकलला आहे. मात्र यावरुन भाजपा आमदार प्रसाद लाड ( BJP MLA Prasad Lad) आणि राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्यात जुंपली आहे. एकनाथ खडसेंना डोक्यावर घेऊन देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचे काम महाविकास आघाडी करत असल्याचा टोला प्रसाद लाड यांनी लगावला होता.
यावर भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी लाड यांनी जनतेतून एकदा निवडून येऊन दाखवावे, मी जनतेतून 6 वेळा सलग निवडून आलो आहे असे आव्हान दिले आहे. तर शरद पवारांचा दौऱ्याला प्रशासनाने परवानगी नाकारल्याने दौरा रद्द झाला आहे. शरद पवार याठिकाणी आल्यास प्रचंड गर्दी होईल, त्यामुळे कोरोनाच्या नियमाचं उल्लंघन होऊ शकते, त्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे अशी माहिती एकनाथ खडसेंनी दिली. शरद पवार येत्या 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार होते, परंतु शरद पवारांचा दौरा आता पुढे ढकलला आहे.
काय म्हणाले होते प्रसाद लाड?
एकनाथ खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते होते, परंतु आता त्यांचा उलटा प्रवास सुरु झाला आहे. स्वत:चे अस्तित्व दाखवण्यासाठी एकनाथ खडसेंची तडफड सुरु आहे. पण त्यांनीही काहीही केले तरी भाजपा कमजोर नाही, आम्ही सक्षम आहोत, आमच्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत. एकनाथ खडसेंना डोक्यावर घेऊन देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचं काम महाविकास आघाडी करतेय असे प्रसाद लाड यांनी म्हटले होते. शरद पवार हे मोठे नेते आहेत, 50 वर्ष शरद पवार राजकीय दौरे करत आहे, राजकीय दौरे हा त्यांचा आवडीचा विषय आहे, परंतु एकनाथ खडसेंसाठी दौरा केल्याने भाजपाला फटका बसेल असे अजिबात वाटत नाही, असेही लाड यांनी म्हटले आहे.
दरम्यान भाजपाला रामराम करत एकनाथ खडसेंनी मुलगी रोहिणीसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केले होते, पक्षप्रवेशावेळी एकनाथ खडसेंनी जळगावमधील मैदान भरून नाथाभाऊंची ताकद काय हे दाखवून देऊ असे म्हटले होते. खडसेंच्या पक्षप्रवेशाला बळ देण्यासाठीच उत्तर महाराष्ट्रात शरद पवार दौरा करणार होते.