निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर वंचित बहुजन आघाडीचा महत्त्वाचा निर्णय
नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे रंगत आली होती. राज्यात येत्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांची मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. त्याच पार्श्वभूमिवर वंचित बहुजन आघाडीनेही आपली भूमिका मांडली आहे. काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत. मात्र आम्ही आमची निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, अस वंचित बहुजन आघाडीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे विधानसभेतही काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार का यावर प्रश्न चिन्ह आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले होते. आता या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. ही सुरुवात नागपुरातून करण्यात आली आहे. वंचित आघाडीकडून लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये त्यांच्या पक्षाव्यतिरिक्त इतर पक्षातील नेतेही इच्छुक आहेत, तसंच या उमेदवारांमध्ये कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याचा खुलासा वंचित आघाडीचे नेते अण्णाराव पाटील यांनी दिली आहे.
तसंच विधानसभेला काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत करण्याबाबत अण्णाराव पाटलांनी वंचित आघाडीची भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. मात्र त्यापूर्वी आम्ही विधानसभेच्या संपूर्ण २८८ जागांवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहोत, अशी माहिती अण्णाराव पाटील यांनी दिली.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढवली. त्याचा मोठा फटका राष्ट्रवादी, आणि काँग्रेसला बसला. वंचित बहुजन आघाडीमुळे मतांचे विभाजन होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला येणारी मते वंचितला मिळाली. याचा मोठा फायदा भाजपला झाला. त्यामुळे वंचित आघाडी ही भाजपचीच बी टीम असल्याचे काँग्रेसकडून बोलले गेले. त्यानंतरही काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीसोबत आघाडी करण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी, विधानसभा निवडणुकीत वंचितने आघाडीत यावं, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. विषय जागांचा नसून संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं म्हटलं होते. मात्र वंचित आघाडी काँग्रेससोबत येण्यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
Comments are closed.