सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभेच्या निवडूका तोंडावर आल्याने प्रत्येक राजकीय पक्षाकडून आपापल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केले जात आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकरांनी गेल्या आठवडय़ात स्वत:ची उमेदवारी जाहीर केली होती. प्रकाश आंबेडकर येत्या २४ मार्च रोजी सोलापुरात येत आहेत. त्याच दिवशी ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्या अनुषंगाने बुधवारी दुपारी अब्दुलपूरकर मंगल कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सोलापुरात काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी निश्चित झालीअसतांना त्यांच्या विरोधात प्रकाश आंबेडकरानी उमेदवारी अर्ज भरला तर मग शिंदेंना निवडून येण्यात अडचणी निर्माण होतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारी अर्ज भरु नये म्हणून काँग्रेसकडून त्यांची मानधरणी चालू असल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले. या पार्श्र्वभूमिवर वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.
या मेळाव्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे व सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन होणार असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष धम्मपाल माशाळकर यांनी सांगितले. या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे माशाळकर यांनी सांगितले.