पंढरपूर : बहुजननामा ऑनलाईन – पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र क्षिरसागर यांचा अपघाती मृत्यू झाला असून त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर राजेंद्र यांच्या मृत्यूमुळे पोलीस दलात देखील शोककळा पसरलीय. या अपघाताचा पोलिस पुढील तपास करीत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर-कोर्टी रोडवर संट्रोमधून येत असताना त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन पलटी झाले. यामध्ये वाहनाखाली दबल्यामुळे राजेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला, असे सांगण्यात येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.
पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र क्षिरसागर हे काही दिवसांपासून सुट्टीवर होते. काल संध्याकाळी काही निमित्ताने ते कोर्टी इथे गेले होते. आज पहाटे संट्रो वाहनातून येताना त्याच्या वाहनाचा ताबा सुटल्याने वाहन पलटी झाले. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र क्षिरसागर हे मुळचे लातुर जिल्ह्यातील आहेत.
मात्र, राजेंद्र क्षिरसागर कोणत्या कारणासाठी कोर्टी भागात गेले होते? सुट्टीवर असताना ऐवढ्या पहाटे घाईने वाहनाने पंढरपुरकडे का निघाले होते? हे अद्याप स्पष्ट समजलेले नाही. पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे याचा पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांनी उपनिरीक्षक राजेंद्र क्षिरसागर यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठविला आहे. तर, पोलीस सध्या अपघाताचा तपास करीत आहे, असे सांगितले जात आहे.