नवी मुंबई : बहुजननामा ऑनलाईन : ड्युटीवर हजर होण्यासाठी निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात पुणे-सोलापूर महामार्गावरील भिगवण परिसरात गुरुवारी (दि.18) पहाटे झाला. सहाय्यक उपनिरीक्षक सूर्यंकांत गायकवाड (वय-54 रा. उरण, मूळ रा. सलगर वस्ती, सोलापूर) असे मृत्यू झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. गायकवाड हे सीबीडी येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर कामावर रुजू होण्यासाठी जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
गुरुवारी सुट्टी संपत असल्याने गायकवाड नोकरीवर रुजू होण्यासाठी जात होते. भिगवण परिसरात गुरुवारी पहाटे त्यांच्या कारची धडक ट्रक्टरला पाठिमागून बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन गायकवाड यांचा मृत्यू झाला. अपघातात त्यांच्यासोबत असलेले इतर दोन जण जखमी झाले आहेत. गायकवाड हे उरण येथे सहकुटुंब वास्तव्यास होते. दोन वर्षापूर्वी उरण पोलीस ठाण्यातून त्यांची सीबीडी येथील पोलीस मुख्यालयात राखीव विभागात बदली झाली होती. सध्या ते दोन दिवसांची सुट्टी घेऊन सोलापूर येथील सलगर वस्ती येथील मूळ गावी गेले होते.
गुरुवारी सुट्टी संपत असल्याने नोकरीवर रुजू होण्यासाठी बुधवारी रात्री ते गावावरून निघाले होते. पहाटेच्या सुमारास भिगवण येथे समोर चाललेल्या ट्रॅक्टरला कारची मागून धडक बसली. अपघात झाला त्यावेळी गायकवाड चालका शेजारच्या सीटवर बसले होते. तर त्यांचे इतर दोन मित्र पाठिमागे बसले होते. गायकवाड ज्या बाजूला बसले होते, तो भाग ट्रॅक्टरच्या मागच्या भागावर जोरदार धडकला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गायकवाड आणि त्यांच्या मित्रांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासून गायकवाड यांना मृत घोषीत केले. त्यांच्या दोन मित्रांची प्रकृती ठीक आहे. अपघाताची माहिती मिळताच त्यांची पत्नी व दोन मुले, मुलगी व जावई गावाकडे रवाना झाले.