भोपाळ : बहुजननामा ऑनलाईन – पोलिस अधिकाऱ्याचा महिला नायब तहसीलदारासोबत वाद झाला होता. या वादाच्या रागातून महिला अधिकाऱ्याचा आक्षेपार्ह फोटो पोलिस अधिकाऱ्याने सोशल मीडियावर टाकला होता. त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
दतिया पोलिस ठाण्याचा पोलिस निरीक्षक शिशिर दास असे या आरोपीचे नाव आहे. तर पीडित महिला अधिकारी ही नायब तहसीलदार आहे. या दोघांमध्ये एक जुना वाद आहे. या वादातून महिला तहसीलदार यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने या पोलिस अधिकाऱ्याने आक्षेपार्ह फोटो टाकले आहेत. तसेच त्यांच्या राजीनाम्यासाठीही दबाव आणला होता. याबाबत सहाय्यक पोलिस अधीक्षक (ASP) समीर यादव यांनी सांगितले, की ‘नायब तहसीलदार महिला अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिस निरीक्षक दास यांना अटक केली आहे. त्यांच्यावर IPC आणि IT अॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे’.
दरम्यान, मध्यप्रदेश राज्यात यापूर्वीही महिलांवरील लैंगिक शोषणाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यावरून अनेक प्रकरणात पोलिसांनी आरोपींवर कारवाईही केली आहे. त्यानंतर आता पोलिस अधिकाऱ्याचे नाव आल्याने पोलिसांनी त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.