बहुजननामा ऑनलाईन टीम – पोलिसांनी चंद्रभागेतुन वाळू तस्करी करणाऱ्या माफियांविरुद्ध कंबर कसली असून आज वाळू चोरी करीत असताना पोलिसांनी छापे टाकले. यावेळी पोलिसांनी चक्क ४३ गाढवांना ताब्यात घेतले आणि ४ दुचाकी देखील जप्त करण्यात आले.
चंद्रभागा येथून नियमितपणे वाळू माफिया गाढवावरून वाळू तस्करीचा व्यवहार करत असे. अनेक वेळा पोलिसांनी छापे मारल्यास हे वाळू माफिया गाढवे सोडून पाण्यातून पळून जायचे. म्हणून ते कधीही पोलिसांच्या ताब्यात नाही यायचे. परंतु यावेळी जेव्हा पोलिसांनी नगरपालिका पाणीपुरवठा केंद्राजवळ छापा टाकला. तेव्हाही हे माफिया गाढवे आणि आपली वाहने सोडून पाण्यातून पळून गेले. यावेळी मात्र पोलिसांनी तेथे असलेले ४३ गाढवे आणि ४ दुचाकी, तसेच ३ ब्रास वाळू ताब्यात घेतले आहे. परंतु यातही धक्कादायक बाब म्हणजे या ४ दुचाकीमधील २ दुचाकी हे चोरीचे असल्याचे लक्षात आले.
वाळू तस्करी करणाऱ्या माफियांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी चक्क गाढवे ताब्यात घेतली. पण या गाढवांना चारा पाणी देण्याची वेळ मात्र पोलिसांवर आली आहे. आज दिवसभर या गाढवांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवल्याने स्टेनला कोंडवाड्याचे स्वरूपचं आले होते. न्यायालयाच्या सूचनेनुसार या गाढवांना आता प्राणीमित्र संघटनेच्या ताब्यात देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. अशा या वाळू माफियांवर वाळू तस्करी सोबतच आता मुक्या प्राणांवरील अत्याचाराची कलमे ही लावण्यात येणार आहेत. म्हणून आता या गुह्याचे गांभीर्य वाढले आहे.
वाळू माफिया वाळू उपशासाठी पंढरपूर शहरात ५ हजारापेक्षा जास्त गाढवांचा वापर या कारणासाठी केला जातो. एक गाढव मालकाला दिवसभरातून ५ ते १० हजार रुपयाचा व्यवसाय करून देतो. आता अशा बेकायदा वाळू तस्करीवर आळा आणण्यासाठी शहरातील गाढवे पकडून त्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम सध्या पोलिसांनी सुरु केली आहे.