PMC Property Tax | समाविष्ट गावांतील मिळकत कर थकबाकी वसुलीला स्थगिती ! मात्र, जुन्या हद्दीतील थकबाकी वसुलीसाठी एक डिसेंबरपासून बँड पथक

November 30, 2024

महापालिकेच्या मिळकत कर विभागाचे वसुलीसाठी मोठे पाउल

पुणे : PMC Property Tax | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महायुती सरकारने (Mahayuti Govt) महापालिकेत समाविष्ट केलेल्या ३२ गावांमधील मिळकत कर थकबाकीला वसुलीला स्थगिती दिली आहे. यानंतर जुन्या हद्दीतील थकबाकी वसुली शिथिल झाली होती. परंतू विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होताच महापालिकेने थकबाकीदारांकडून वसुलीसाठी एक डिसेंबर पासून थकबाकीदारांच्या दारात ‘बँड’ वाजवायचे नियोजन केले आहे.

      महापालिकेने चालू वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये सुमारे २ हजार ७०० कोटी रुपये मिळकत कर उत्पन्नाचे उद्दीष्ट ठेवले आहे. आतापर्यंत दीड हजार कोटी रुपये उत्पन्नाचा टप्पा ओलंडला देखिल आहे. पहिली सहामाही संपल्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने थकबाकी वसुलीच्या कामाला काहीसा ब्रेक लागला होता. अशातच लोकसभा निवडणुकीपुर्वी नव्याने महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांतील मिळकत कर थकबाकी वसुलीस राज्य शासनाने ब्रेक लावला. यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर २०१७ मध्ये महापालिकेत समाविष्ट झालेल्या उरूळी देवाची आणि फुरसुंगी वगळता उर्वरीत ९ गावांतील थकबाकी वसुलीला देखिल ब्रेक लावण्यात आला. या गावांमध्ये तब्बल एक हजार २०० कोटी रुपये थकबाकी आहे. परंतू नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच याबाबत निर्णय होणार आहे.


  दरम्यान, महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने येत्या एक डिसेंबरपासून जुन्या हद्दीतील थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम आखली आहे. थकबाकीदारांच्या दारात ‘बँड’ वाजवण्यात येणार आहे. यासंदर्भात कर आकारणी विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले महापालिकेच्या जुन्या हद्दीतील मिळकतींकडे तब्बल चार हजार ५०० कोटी रुपये थकबाकी आहे. थकबाकीदारांच्या दरवाजामध्ये बँड पथक लावून थकबाकी वसुली करण्यात येणार आहे. प्रशासनाने थकबाकीदारांकडे पाठपुरावा केल्यानंतर मिळकत जप्तीची कारवाई देखिल सुरू केली असून तांत्रिक प्रक्रिया पार पाडून लिलाव देखिल सुरू करण्यात आले आहेत. कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी तातडीने कर भरावा, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.