काटमांडू : वृत्तसंस्था – राजकीय आणि कायदेशीर अडचणीत सापडलेले नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली सध्या चर्चेमध्ये आहेत. त्यांनी पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्याला छेडले असून नेपाळमध्ये राम मंदिर निर्माणाचे काम सुरु झाले असल्याचे ओली यांनी म्हटले आहे. चितवनमध्ये नेपाळ कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, नेपाळच्या बीरगंजमध्ये मंदिराच्या उभारणीसाठी काम सरु झाले आहे.
काही दिवसांपूर्वी नेपाळचे पंतप्रधान केपी. शर्मा ओली यांनी भगवान राम यांचा जन्म नेपाळमध्ये झाल्या असल्याचे सांगितले. भगवान रामाचा जन्म नेपाळमधील अयोध्यापुरी येथे झाला असल्याचा दावा करत भगवान राम नेपाळी असून ते भारतीय नसल्याचे ओली यांनी म्हटले होते. यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी भारतविरोधी विधाने करणे सुरु ठेवले. त्यांच्या राम मंदिरासबंधी वक्तव्याने त्यांनी भारताचा रोष ओढावून घेतला आहे.
चितवनमध्ये बोलताना ओली म्हणाले की, आयोध्यापुरीमध्ये राम मंदिर निर्माणासाठी एक मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. रामाची मूर्ती तयार झाली असून देवी सीतेची मूर्ती बनवण्याचे काम सुरु आहे. मंदिरात लक्ष्मण आणि हनुमानाच्या मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. ओली यांच्या म्हणण्यानुसार पुढील वर्षी राम नवमीला भगवान रामाच्या जन्मस्थळी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येईल. ते पुढे म्हणाले की, राम मंदिराच्या उभारणीनंतर चितवनला एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यात येणार आहे. चितवन संपूर्ण जगात हिंदू, मानव सभ्यता आणि संस्कृतीचे एक आकर्षक केंद्र बनेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, नेपाळची संसद बरखास्त करण्यात आल्याने देशात पुन्हा एकदा निवडणुका घेण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. ओली यांच्या नेपाळी कम्युनिस्ट पार्टीत फूट पडली असून हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. मागील वर्षी वादग्रस्त वक्तव्य करताना ओली म्हणाले होते की, भगवान राम नेपाळी आहेत, ते भारतीय नाहीत.तसेच त्यांना सत्तेतून हटवण्यामागे भारताचा हात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याचा भारताने निषेध केला तर त्यांच्या पक्षातूनही त्यांना विरोध झाला होता.