नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत मोदी सरकारने मोठा रेकॉर्ड रचला आहे. या योजनेचे आता 10 कोटींपेक्षा जास्त लाभार्थी झाले आहेत. सरकारला आता आणखी 4.5 कोटी शेतकर्यांना याचा फायदा पोहचवायचा आहे. या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशातील सर्वात अधिक 2 कोटी 30 लाख शेतकरी या योजनेशी जोडले गेले आहेत. या योजनेमध्ये नोंदणी करण्यात आलेल्या शेतकर्यांना शेतीसाठी वार्षिक 6000 रुपये मिळतात. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्या मते ही योजना शेतकर्याचे उत्पन्न दुप्पट करण्यास अत्यंत महत्त्वाची आहे.
कृषी मंत्रालयाच्या अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, योजनेचा पुढील हप्ता शेतकर्यांना 1 ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे. जर तुम्ही उर्वरित 4.5 कोटी शेतकर्यांपैकी असल्यास, तुम्ही ऑनलाइन अर्ज देखील करू शकता. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला आहे आणि योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे का हे तुम्हाला तपासायचे आहे, तर आता हे काम देखील ऑनलाइन शक्य आहे. पीएमकिसान या वेबसाईटवर तुम्ही पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या यादीमध्ये तुमचे नाव आहे का हे तपासू शकता. त्यानंतर त्याठिकाणी दिसणार्या ’फार्मर कॉर्नर’ या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही लाभार्थी असाल तर तुमची स्थिती देखील तपासून पाहू शकता.