पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – सात वर्षाच्या मुलीला पाळीव कुत्रा चावल्यानंतर या प्रकरणात कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि.25) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जुनी सांगवी येथील जयमाला नगरमध्ये घडली आहे. संजय विनायक पवार (रा. जयमाला नगर, जुनी सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणी प्रतीक्षा राजकुमार इंगोले (वय-27) असे जखमी मुलीचे नाव आहे. ज्योत्स्ना राजकुमार इंगोले (वय-26 रा. जयमाला नगर, जुनी सांगवी) यांनी याबाबत शनिवारी (दि.26) सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास इंगोले यांची सात वर्षाची मुलगी प्रतिक्षा वडिलांसोबत फोनवर बोलत होती. त्यावेळी आरोपीने पाळलेल्या तीन कुत्र्यांपैकी एक कुत्रा घराच्या बाहेर आला. कुत्र्याने मुलीच्या पायाचा चावा घेतला. यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली आहे. मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर कुत्र्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाला अटक केली असून पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.