पिंपरी/पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी-चिचंवड शहरात कोरोना (Coroan) बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) हद्दीतील 9 वी ते 12 पर्यंतच्या शाळा/महाविद्यालये (School) 3 जानेवारी 2021 पर्यंत बंद (Close) ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. दरम्यानच्या काळात शहरातील शाळा/महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी, शाळेचे निर्जंतुकीकरण आदि खबरदारीच्या उपाययोजना करता येणार आहेत.
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता 13 डिसेंबर पर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. सध्या पालकांची संमतीपत्र घेणे सुरु आहे. आतापर्यंत महापालिकेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची फक्त 1132 संमतीपत्रे प्राप्त झाली आहेत. यामुळे तूर्तास शाळा सुरु करणे योग्य राहणार नाही. या आगोदरच शासनाने स्थानिक पातळीवर यासंदर्भात निर्णय घेण्याचे शासन आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे शहरातील कोरोना परिस्थिती लक्षात घेवूनच शाळा उघडण्यात येणार आहेत.
शासन निर्णयाच्या अनुषंगाने, शाळा-महाविद्यालयातील 9 वी ते 12 वी चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोविड-19 ची चाचणी पूर्ण करण्यात आली आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी शाळा निर्जंतुकीकरण, तापमान मोजणीसाठी गन, डिजिटल थर्मामिटर, हात धुण्याची व्यवस्था, सोशल डिस्टनसिंग प्लॅन इत्यादी गोष्टींची पूर्तता करण्यात येणार आहे. त्यामुळे 3 जानेवारी 2021 पर्यंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील शाळा बंद राहणार असल्याची माहिती महापौर माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.