पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – ‘मी भोसरीचा दादा,’ असे म्हणून गुंड व त्याच्या टोळक्याने चिकनच्या दुकानात शिरून तोडफोड केली. त्याच्या साथीदारांनी लोखंडी रॉड व तलवारीने रस्त्यावरील गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजवली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी किरण राठोड, करण राठोड, अभिजित नलावडे व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शमशुजजोहा जमाद शेख (वय २२, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना भोसरीतील दिघी रोडवरील रमजान चिकन सेंटर दुकानात व सखूबाई गवळी गार्डनच्या बाजूच्या रोडवर रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.
किरण राठोड व त्याचे साथीदार काल सायंकाळी रमजान चिकन सेंटर या दुकानात आले व २ किलो चिकन मागून बळजबरीने आत शिरले. त्यांनी शेख यांच्या गळ्याला तलवार लावून दुकानातील गल्ल्यातून २ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तेथील ५० अंड्यांचा ट्रे फोडला. त्यानंतर तो दुकानाबाहेर गेला.
रोडवर उभा राहून मोठ्याने ओरडून मी भोसरीचा दादा आहे, माझे नाव किरण राठोड, मला कोणी नडायचे नाही, असे म्हणाला. त्यामुळे इतर दुकानदारांनी दहशतीने त्यांची दुकाने बंद करून सर्व लोक भीतीने पळू लागले. तेव्हा त्याने व त्याच्या साथीदारांनी हातातील लोखंडी रॉड व तलवारीने रस्त्यावरील गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजवली.