पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – भोसरी पोलिसांनी मंगळवारी रात्री एकाच वेळी तीन हॉटेलवर छापे घालून खुलेआम सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणार्या हॉटेलचालकांसह १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
भोसरीतील धावडे वस्तीतील साईराज लॉजवर पोलिसांनी छापा घालून तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवून घेणारे प्रशांत राजीवा शेट्टी (वय ३२), चेतन राजू पुजारी (वय ३२) यांना अटक केली. ते तरुणींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेताना मिळून आले. यावेळी प्रशांत मेलगिरी हा पळून गेला. लॉजचालक प्रकाश शेट्टी (रा. हडपसर) हे तिघांकडून बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले.
आळंदी रोडवरील सन लॉज अँड म्युझिक अँड डिस्को लाईट हॉल (सूर्या हॉटेल अँड लॉज) येथे पोलिसांनी छापा मारून वेश्या व्यवसाय करवून घेणार्या तिघांना अटक केली आहे. प्रशांत फाळके (वय ४०, मूळ गाव वाडी, ता. नांदुरा, जि़. बुलढाणा), ज्ञानेश्वर फाळके (वय २७, सध्या रा. सूर्या हॉटेल), परमेश्वर इंगळे (वय ४२, रा. भोसरी) अशी त्यांची नावे आहेत.
आळंदी रोडवरील वनराज हॉटेल बार रेस्टॉरंट व लॉजिंग येथे पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी छापा घातला. तेथून विश्वनाथ शेट्टी (वय ५६), सीताराम शेट्टी (वय ५०), कुबेर पात्रोट (वय ४८, रा. वनराज हॉटेल) यांना अटक केली आहे. तिघे जण महिलांना पैशाचे आमिष दाखवून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेताना मिळून आले. विश्वनाथ शेट्टी याने इमारत मालकाशी कोणत्याही प्रकारचा भाडे करार केला नाही व त्याबाबत पोलिसांना माहिती दिली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे अधिक तपास करीत आहेत.