पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन : जागेची मोजणी करण्यासाठी आलेल्या शासकीय अधिका-यांना एकाने शिवीगाळ केली. तसेच बंदोबस्तावरील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पिस्तूलाची दोरी ओढून त्यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केल्याची घटना गुरुवारी (दि. 25) वाकड येथे घडली. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
विजय निवृत्ती वाघमारे (वय 60, रा. वाकड गावठाण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार दीपक गायकवाड यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील सखाराम वाघमारे अंडरपासजवळ एका जमिनीची मोजणी करण्यासाठी बंदोबस्त लावण्याबाबत मंडल अधिका-यांनी वाकड पोलिसांना अर्ज दिला होता.
त्यानुसार पोलीस बंदोबस्तात गुरुवारी सकाळी जागेची मोजणी सुरू असताना, आरोपी वाघमारे याने मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच यावेळी आरोपीने वरिष्ठ निरीक्षकांना देखील शिवीगाळ केली. तसेच, मारहाण करण्यासाठी अंगावर धावून आला.
दरम्यान त्याने यावेळी पोलीस निरीक्षकांच्या कमरेला असलेल्या पिस्तूलाची दोरी ओढून आरडाओरडा करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. वाकड पोलिस अधिक करीत आहे.