पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीचे माजी विरोधीपक्ष नेते आणि विद्यमान नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या चालकासह कुटुंबियातील 11 जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे. नगरसेवकासह सगळ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
नगरसेवकाच्या नेहमीसोबत असणार्या सहकारी चालकासोबत त्या चालकाच्या कुटुंबातील 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाबही समोर आली आहे. लॉकडाऊनच्या काळात आणि सद्य परिस्थितीतही शेकडो नागरिकाना अन्नधान्य वाटप करत असल्याने आपण अनेकांच्या संपर्कात आलो होतो. त्याच बरोबर महापालिकेतील सर्वसाधारण सभेलाही उपस्थित होतो. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणार्या सर्वांची चाचणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
दोन दिवसांपूर्वी या नगरसेवकाला घशात खव-खव होत होती आणि श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांनी सहकार्यासह सर्वांची कोव्हिड टेस्ट केली. काल रात्री त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. याआधी चिंचवड परिसरातील सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेविकेसह त्यांच्या कुटुंबातील 8 जणांना तर दापोडी परिसरातील राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकासह त्यांच्या कुटुंबातील 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.