Pimpri Chinchwad Cyber Police News | कुरीयरमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगून अटकेच्या भितीने लुबाडणूक करुन देशभर धुमाकुळ घालणार्या जोधपूरच्या सायबर चोरट्यांना पुण्यातून अटक
18 मोबाईल, 90 सिमकार्ड, 60 एटीएम कार्डसह 72 लाखांचा माल हस्तगत
पिंपरी : Pimpri Chinchwad Cyber Police News | कुरीयरमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगून तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तुम्हाला अटक केली जाऊ शकते, असे सांगून मुंबई, लखनौ, दिल्ली पोलीस तसेच सीबीआयच्या नावाचा वापर करुन फसवणूक (Cheating Fraud Case) करण्याचा प्रयत्न सायबर चोरटे करत आहेत. या मोडसने सध्या देशभर धुमाकुळ घातला आहे. दररोज कोट्यावधींना गंडा घातला जात आहे. अशा प्रकारे लोकांना फोन करुन त्यांना लुबाडणारी टोळी जोधपूरच्या टोळीला (Jodhpur Gang Arrested In Pune) पुण्यातून पिंपरी चिंचवडच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
मोहम्मद इलियास मोहम्मद सदिक कलाल (वय ३६, रा. लोसल, जि. सिकर, जयपूर, राजस्थान), मोहम्मद शाहिद अहमद अली (वय २५, रा. खेतन आडी मंडोर रोड, जोधपूर, राजस्थान), पुरणसिंग रतनसिंग (वय २४, रा. किशोरबाग मंडोर रोड, जोधपूर, राजस्थान), नाजील खत्री मन्वरअली खत्री (वय २९, रा. खेतन आडी, मंडोर रोड, जोधपूर, राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वाकड वाकड येथे राहणार्या एकाला आरोपींनी व्हॉटअअॅप टेलिग्रामद्वारे व्हिडिओ कॉल करुन फेडेक्स कुरीयरमधून बोलत असल्याचे सांगून मुंबई कस्टम डिपार्टमेंटला तुमच्या कुरीयरमध्ये १०० ग्रॅम ड्रग मिळाले आहे. या पार्सलवर तुमचे नाव व आधार नंबर लिंक आहे. त्यासाठी तक्रार करण्यास मदतीचे बहाण्याने मुंबई नार्कोटिक्स डिपार्टमेंटमधून पोलीस अधिकारी बोलत असल्याचे भासविले. फिर्यादी यांना अटकेची भिती घालून क्लियरन्स सर्टिफिकेटच नावाखाली विश्वास संपादन करुन फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक खात्यात १२ लाख २२ हजार १३३ रुपये भरायला लावून फसवणूक केली होती.
वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) दाखल झालेल्या या गुन्ह्याचा सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविकिरण नाळे हे तपास करत होते. सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, विद्या पाटील यांचे पथक तयार करण्यात आले होते. या गुन्ह्यासाठी वापरलेले बँक अकाऊंटपैकी एक नाशिक येथील गरीब रिक्षाचालकाचे असल्याचे समजले. एका काळ्या रंगाचे स्कॉपिओ कारमधून एक जण येऊन अकाऊंटमधील पैसे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन तपास केल्यावर राजस्थानमधील जोधपूर येथील काही जण उंड्री, पिसोळी भागात काही दिवसांपासून येऊन रहात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पिसोळी येथील ए आर व्ही न्यू टाऊन सोसायटीमध्ये छापा टाकला. तेथील चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे १८ मोबाईल फोन, ९० मोबाईलचे सिमकार्ड, लॅपटॉप -१, बॅक पासबुक किट – ६०, एटीएम/ डेबिट कार्ड – ६०, पासपोर्ट – २, आधार कार्ड -१५, पॅन कार्ड – ३, ड्रायव्हिंग लायसन्स -३, फॉर्च्युनर कार, स्कॉर्पिओ कार असा ७२ लाख १७ हजार २०० रुपयांचा माल जप्त केला.
त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी वाकडमधील फिर्यादीला फसविल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक तपासामध्ये आरोपी हे फसवणूकीचे रक्कमेतून युएसडीटीमार्फत देशांतर्गत व परदेशात पैसे पाठवित असल्याची माहिती समोर आली आहे. त्या अनुषंगाने अधिक तपास करायचा आहे. त्यांच्याकडे गुन्हा करण्यासाठी वापरलेले बँक अकाऊंट, त्यामधील व्यवहार, इतर साथीदार यांच्याकडे मिळून आलेला माल, त्यांचा अशा प्रकारे किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे, याचा तपास सुरु आहे.
अशा प्रकारे येणार्या फसव्या फोनला घाबरुन जाऊ नये, तसेच अनोळखी कॉलवर विश्वास न ठेवता जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन खात्री करुन घ्यावी, पोलीस अशा प्रकारे कोणालाही फोन करत नाही अगर डिजिटल अरेस्टची भिती घालत नाही. कोणत्याही परिस्थितीत आपला मोबाईल स्क्रिन, बँक अकाऊंट, वैयक्तिक माहिती शेअर करु नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, विद्या पाटील, वैभव पाटील, प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार हेमंत खरात, दीपक भोसले, दीपक माने, अतुल लोखंडे, प्रितम भालेराव, अभिजित उकिरडे, श्रीकांत कबुले, सौरभ घाटे, संदिप टेकाळे, निलेश देशमुख, सुरंजन चव्हाण, मुकुंद लोटके, प्रिया वसावे, दिपाली चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.
Comments are closed.