पिंपरी/पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. राज्यात इतर जिल्ह्याप्रमाणे पुणे जिल्ह्यात देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असताना पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 401 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले
आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात 414 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (सोमवार) शहरामध्ये 5 कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 9 हजार 435 वर पोहचली आहे. तर 1 लाख 2 हजार 753 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण घटले असले तरी कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता वाढली आहे.
गेल्या 24 तासामध्ये 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला रुग्ण चिखली, पिंपरी, पिंपळे गुरव, मुळशी, औरंगाबाद येथील आहे. आतापर्यंत शहरात 2641 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1859 शहरातील तर 782 पालिका हद्दीबाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1 हजार 309 रुग्ण ॲक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.