पिंपरी/पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण घटले होते. मात्र, मागील दोन-तीन दिवसांपासून शहरात रुग्ण संख्या वाढू लागल्याने आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 150 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 25 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (रविवार) शहरामध्ये एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकिय विभागाने दिली आहे.
गेल्या 24 तासात शहरामध्ये 150 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 768 वर पोहचली आहे. आज 25 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 97 हजार 965 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.
गेल्या 24 तासामध्ये पालिका हद्दीतील एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत शहरात 2597 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1827 शहरातील तर 770 पालिका हद्दीबाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 705 रुग्ण ॲक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालीका हद्दीबाहेरील 115 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 108 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.