पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यात पुण्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत असून वाढत्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने प्रशासनाची झोप उडवली आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील कोरोना संक्रमीत रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. रुग्ण संख्या वाढत असताना शहरात रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत असल्याने दिलासा मिळत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 845 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर 403 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 14 हजार 026 इतकी झाली आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 1 लाख 5 हजार 256 इतकी झाली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये 5 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये चार रुग्ण पिंपरी चिचंवड हद्दीतील आहेत तर एक रुग्ण हद्दीबाहेरील आहे. रुग्ण वाढत असताना शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या शहरामध्ये 1 हजार 319 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आज शहरामध्ये मृत्यू झालेले रुग्ण मोशी, विठ्ठलनगर, संत तुकारामनगर, निगडी, आळेफाटा येथील रहिवासी आहे. आजपर्यंत शहरात कोरोनामुळे 2 हजार 666 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 1876 तर हद्दीबाहेरील 790 रुग्णांचा समावेश आहे. सध्या शहरामध्ये हद्दी बाहेरील 181 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर शहरातील 61 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, नागरिकांनी विना मास्क बाहेर फिरुन नये, तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे.