पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅसची चोरी करणाऱ्या टोळीचा पिंपरी- चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सांगवीतून गॅस चोरी करणा-या तब्बल 22 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 14 टेम्पोमधील 312 गॅसच्या भरलेल्या आणि रिकाम्या टाक्या सामाजिक सुरक्षा पथकाने ताब्यात घेतल्या आहेत.
पोलिसांनी ताब्यात घेतलेले सर्व आरोपी सांगवी परिसरातील भैरवनाथ गॅस एजन्सीमधील कर्मचारी आहेत. घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅस काढून तो व्यवसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये भरायचा आणि नंतर तो ब्लॅकने विकायचा असा उद्योग या टोळीने चालवला होता.
मुख्य गोडाऊनमधून इतर दुसऱ्या गोडाऊनमध्ये गॅस सिलेंडर घेऊन जाऊन तिथे कनेक्टरच्या साहाय्याने एका सिलेंडरमधून एक ते दोन किलो गॅस दुसऱ्या मोकळ्या गॅस सिलेंडरमध्ये काढून घेऊन तो पुन्हा ग्राहकांना विकत असत.