नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या महिनाभरापासून पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीचे आकडे अचानक थांबले होते. त्यामुळे तेल वितरण कंपन्यांना पेट्रोलच्या विक्रीवर प्रतिलिटर 4 रुपये आणि डिझेल विक्रीवर प्रतिलीटर 2 रुपये तोटा सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 24) बऱ्याच दिवसांनी पेट्रोल 18 पैशांनी आणि डिझेल 17 पैशांनी स्वस्त झाले आहे. मुंबईत आज पेट्रोलचा दर 97.40 रुपये झाला. कालपर्यंत हा दर 97.57 रुपये प्रति लीटर होता. तर डिझेलचा आजचा दर 88.42 रुपये प्रति लीटर झाला असून काल हा दर 88.60 रुपये प्रति लीटर होता.
गेल्या महिन्यात सलग 16 दिवस पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली होती. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाल्याने देशभरात संतापाचे वातावरण होते. राजस्थानसह अन्य राज्यामध्ये तर पेट्रोलने शंभरी पार केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गेल्या 15 दिवसांत 10 टक्क्यांनी घसरले आहेत. युरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. यामुळे तिथे इंधनाची मागणी घटण्याची शक्यता आहे. यामुळे 71 डॉलरवर गेलेले कच्च्या तेलाचे बॅरल 64 डॉलरवर आले आहे. यामुळे ऑईल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात केली आहे.