पुणे बहुजननामा ऑनलाईन : शेतात गवत कापायला गेलेल्या फासेपारधी समाजाच्या महिलेला अश्लील बोलून विनयभंग करत शिवागीळ केली. त्यानंतर शेतातील मिरच्या चोरल्याचा आरोप करत चार ते पाच जणांनी मारहाण केली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील ५ जणांवर विनयभंग तसेच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितेल.
विशाल बाळू कुंजीर व इतर चार जण अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून २६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. तर मारहाण करणाऱ्या व्यक्तींनी दिलेल्या फिर्यादीनुसार महिलेसह तिच्या कुटुंबियांवरदेखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काय घडला प्रकार ?
फिर्यादी महिला ही फासेपाऱधी समाजातील आहे. ही महिला बाळू कुंजीर याच्या शेताजवळ असलेल्या बांधावर गायींसाठी गवत कापण्यास गेली होती. त्यावेळी विशाल कुंजीर तेथे आला. त्याने महिलेशी काय गं तू कुठे जाशील ?असे म्हणत अश्लील भाषेत बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिच्या छातीला हात लावून तिचा विनयभंग केला. तसेच तिने नकार दिल्यावर तू मला नकार देतेस मग तुझ्यावर मिरच्या चोरल्या म्हणून तुला लोकांमध्ये उघडी करून मारतो अशी धमकी देत मारहाण केली. त्यावेळी विशाल कुंजीर त्याचे वडील बाळू कुंजीर आणि इतर चार जणांनी गर्दी जमवून तिला झगडे वस्तीत आणले. त्यावेळी तिचा मोठा भाऊ आणि भावजय तेथे आले. त्यांनी तिला मारहाण करण्याचे कारण विचारले. तेव्हा तुमच्या बहिणीने आमच्या शेतातील मिरच्या चोरल्या आहेत असं म्हणत जातिवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण करत तुम्ही कोठेही गेलात तरी तुम्हाला चोरीच्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील करत आहेत.
पोलीस काय म्हणाले ?
महिला गवत कापायला कुंजीर यांच्या शेताजवळ गेल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावरून प्रकार घडला असून याप्रकरणी दोन्ही बाजूची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. तसेच विशाल कुंजीर व इतर चार जणांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा तपास सुरु आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय बंडगर यांनी दिली.