परळी : बहुजननामा ऑनलाईन – काल सकाळी परळी शहरात एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले होते. पोलीस तपासात असे समोर आले आहे की, ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली आहे. तपासाला वेग दिला असता दोन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.
खून झालेल्या युवकाच्या शरीरावर हत्याराने वार केल्याच्या खुना दिसत होत्या. गणेशपार भागातील अनिल हालगे असं या खून झालेल्या 22 वर्षीय युवकाचं नाव आहे. या युवकाचा मृतदेह सकाळी पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या कब्रस्तानमध्ये आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत हत्येत वापरलेला दगड, ब्लेड आणि तुकडे केलेला मोबाईल त्यांनी पोलिसांना दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली आहे. दरम्यान या घटनेतील एक आरोपी अल्पवयीन आहे. आरोपीविरोधात शहर पोलीस ठाण्यात 302 चा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येनंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.