नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपण पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेला नसेल तर ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. आयकर विभागाने पॅन आणि आधार जोडण्यासाठी अंतिम तारीख ३१ मार्च २०२० पर्यंत वाढविली आहे. प्राप्तिकर विभागाच्या या आदेशानंतर सर्व पॅनकार्डधारकांनी त्यांचा पॅन व आधार वेळेत जोडणे आवश्यक झाले आहे. यावेळेस जर ३१ मार्च २०२०ची तारीख निघून गेली तर येत्या काळात तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागू शकतो. जर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमची समस्या वाढेल. नियमानुसार,आपला पॅन प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३९AA अंतर्गत अवैध केला जाईल. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पॅनकार्ड लिंक नसेल तर आयटीआर ऑनलाईन भरणे कठीण होईल. आपला कर परतावा अडकला असू शकतो. या व्यतिरिक्त आपण कोणतेही आर्थिक व्यवहार करता तेव्हा आपण त्या वेळी पॅन वापरण्यास सक्षम राहणार नाही.
आधार आणि पॅन कसे लिंक कराल
आपण आयकर ई-फाइलिंग पोर्टलद्वारे किंवा एसएमएसद्वारे आपला पॅन आणि आधार लिंक देखील करू शकता. प्राप्तिकराच्या ई-फाईलिंग पोर्टलवर आधार लिंकचा एक विभाग आहे. आपल्याला आपला पॅन आणि आधार क्रमांक येथे प्रविष्ट करावा लागेल. त्यानंतर त्यास ओटीपीद्वारे लिंक केले जाऊ शकते.
दुसर्या पर्यायामध्ये आपण ५६७६७८ किंवा ५६१६१ वर एसएमएस पाठवू शकता. यासाठी तुम्हाला UIDPAN <१२ आकडी आधार क्रमांक> <१० अंकांचा पॅन क्रमांक प्रविष्ट करावा लागेल व तो दिलेल्या नंबरवर पाठवावा लागेल.
ऑनलाइन लिंक कसे करावे :
१. सर्वप्रथम, जर आपले खाते तयार केले नसेल तर पहिल्यांदा रजिस्टर करा.
२ . प्राप्तिकर विभागाच्या ई-फाईलिंग वेबसाइटला भेट द्या (www.incometaxindiaefiling.gov.in).
३. त्यांनतर वेबसाइटवर ‘लिंक आधार’ असा पर्याय दिसेल. त्यावर लॉगिन नंतर, आपल्या खात्याच्या प्रोफाइल सेटिंग्जवर जा.
४. प्रोफाइल सेटिंग्जमध्ये, तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्याचा पर्याय दिसेल, तो निवडा.
५ . येथे दिलेल्या विभागात तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरा.
६. खाली दिलेल्या ‘लिंक आधार’ पर्यायावर क्लिक करा.
७. यानंतर आपला आधार लिंक केला जाईल.